प्रहारच्या आंदोलकांचा कोल्हापूर नाक्यावर रास्तारोको. आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात. रस्ता रोको प्रसंगी अजितराव बानगुडे, सचिन नलवडे, जावेद नायकवडी, भानुदास डाईंगडे, शिवाजी चव्हाण यांना अटक.

कराड – प्रतिनिधी.

येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दुर कराव्यात या मागणीसाठी प्रहार संघटनेचे मनोज माळी गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रहारसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंंगळवारी कोल्हापूर नाक्यावर शहरातून बाहेर येणारा रस्ता अडवत रास्तारोको केला. वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

     कराड, पाटणसह कडेगाव तालुक्यातील गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या उपजिल्हा रूग्णालयात तज्ञ, डॉक्टर, कर्मचारी आदी पदे रिक्त आहेत तर आरोग्य सेवेच्या अनेक गैरसोयी आहेत. याबाबत मनोज माळी पाच वर्षांंपासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासनासह मंत्री, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे रूग्णालयाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. ही दुरावस्था कायमची दूर व्हावी आणि रूग्णांना योग्य त्या सुविधा मिळाव्या म्हणून मनोज माळी यांनी सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. 

      प्रशासनाने अध्याप या आंदोलनाची दखल न घेतल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजितराव बानगुडे व भानुदास भानुदास डाईनगडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कोल्हापूर नाका येथे रस्ता रोको करण्यात आला. यावेळी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जावेद नायकवडी,  शिवाजी चव्हाण,  आर पी आय चे माधुरी टोणपे, अशोक पवार, वैभव चव्हाण व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

     आंदोलन अधिक तीव्र करणार – अजितराव बानगुडे

        उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दुर झाल्यास हजारो गरीब रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी मनोज माळी पाच वर्षांंपासून अविरतपणे पाठपुरावा करीत आहेत. गेली सहा दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. तरीही प्रशासनाच्या डोळ्यावरची झापड जात नाही. त्यामुळे आज रस्ता रोको करण्यात आला आहे. प्रशासनाने तत्काळ उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी दुर केल्या नाहीत तर प्रहारच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अजितराव बानगुडे यांनी दिला आहे.